दहावी, बारावी केंद्रावर गैरप्रकार झाल्यास आता परीक्षा केंद्राची मान्यता होणार रद्द
बारावीला सरासरी पंधरा लाख तर दहावीला सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
दहावी आणि बारावी केंद्रावरील संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यंदाच्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षांपासून रद्द करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी व बारावीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षा काळात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.
दरम्यान, बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे. दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहेत. राज्य मंडळाने बारावी व दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून वेळापत्रक अंतिम करण्यात आले. बारावीला सरासरी पंधरा लाख तर दहावीला सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.



