मुंबईतील तंदूर रोटी होणार बंद

मुंबई / प्रतिनिधी
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलं की तंदुर रोटी ऑर्डर करणे म्हणजे नित्यनियमाचं बनलं आहे. पंजाबी तंदुर रोटी हा सर्रास खवय्यांचा आवडता पदार्थ बनला आहे. भाकरी, रोटी, चपाती, तांदुळाची भाकरी, पुरी, बटर नान यांसह तंदुर रोटी हा देखील प्रसिद्ध रोटी प्रकार आहे. त्यातच, धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही. कारण, कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या आणि ढाब्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारण, कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर किचनमध्ये करण्याच्या सूचनादेखील महापालिकेनं दिल्या आहेत. यापुढे, मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही, त्याऐवजी सिएनजी, पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना दिल्या आहेत. हॉटेलचालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीसमधून सर्वच व्यवसायिकांना देण्यात आला आहे.
नोटीस बजावून आणि सूचना देऊन सुद्धा रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल. 9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे, कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत.



