मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार इतके रुपये

प्रतिनिधी / मुंबई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारीला दिली होती. अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असे सांगितले होतं. मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आज पासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग विभागानं दिली आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, देखील विभागाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणपणे ९ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळं यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळतील.



