राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट

प्रतिनिधी / मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणालेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदारयाद्यांतील चुकांवर बोट ठेवत आयोगावर धारदार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण आमचे समाधान झाले नाही. आयोगाने आमच्या प्रश्नांची कोणतीही स्पष्ट उत्तरे आम्हाला दिले नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील चुकांकडे आयोगाचे लक्ष वेधले. पण आयोगाने आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे ती निवडणूक चुकांसह झाली. काही आमदार सांगतात की, आम्ही बाहेरून 20 हजार मते आणली. काहींची नावे वगळली गेली, तर काहींची तीच तीच नावे दिसून येत आहेत.



