Uncategorized

अजितदादांची प्रथम कलशातील अस्थिविसर्जन बारामती तालुक्यातील कऱ्हा-नीरा संगमावर

बारामती / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जाण्याने हादरलेला असताना, राख सावडण्याच्या कार्यक्रमात एक मौन अधिक बोचणारे ठरले, ते होते शरद पवार यांचे. कुठलाही उद्गार नाही, कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही. फक्त जड पावले आणि अस्थिकलशात राख अर्पण करण्याची शांत, थरथरती हालचाल.राजकारणात शब्दांवर प्रभुत्व असलेले, प्रसंग कितीही कठीण असला तरी तोल सांभाळणारे शरद पवार या वेळी मात्र पूर्णपणे नि:शब्द होते. त्या मौनात दु:ख होते, अपूर्णतेची जाणीव होती आणि एका कुटुंबाने, एका नेतृत्वाने आणि महाराष्ट्राने गमावलेला आधार स्पष्टपणे दिसत होता. अजित पवार हे केवळ सहकारी किंवा पक्षातील महत्त्वाचे नेते नव्हते, तर शरद पवारांच्या राजकीय वाटचालीतील एक मजबूत आधारस्तंभ होते. निर्णयक्षमता, कामाचा वेग आणि आक्रमक प्रशासकीय शैलीमुळे अजित पवारांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ती ओळखच आज शरद पवारांच्या मौनात अधिक ठळकपणे जाणवत होती. राख अर्पण करताना शरद पवारांचा चेहरा निर्विकार होता, पण डोळ्यांत दाटलेले दु:ख लपवता येत नव्हते. त्या क्षणी कुठल्याही भाषणापेक्षा, कुठल्याही शब्दांपेक्षा ते मौनच अधिक बोलके ठरले. कधी शब्दांनी दिशा देणारे शरद पवार आज शब्दांआधीच थांबले होते.

पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाचे दु:ख पचवत तिसऱ्याच दिवशी माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी बारामती परिसरातील नीरा नदीची पाहणी करून नदीतील प्रदूषित पाण्याचा आढावा घेतला. या निमित्ताने शरद पवारांनी बारामतीत पुन्हा लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होतात का ? हे पहावे लागेल.

अजितदादांच्या अस्थींचे पाच कलश तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम कलशातील अस्थिविसर्जन बारामती तालुक्यातील कऱ्हा-नीरा संगमावर करण्यात आले आहे. इतर कलश प्रयागराज (उत्तर प्रदेश)– गंगा-यमुना-सरस्वती त्रिवेणी संगम, देवप्रयाग(उत्तराखंड)–अलकनंदा-भागीरथी संगम, कराड-कृष्णा-कोयना (प्रीतिसंगम), प्रवरासंगम (अहिल्यानगर) – गोदावरी-प्रवरा संगम, नृसिंहवाडी (कोल्हापूर) – कृष्णा-पंचगंगा संगम येथे विसर्जित करण्यात येणार आहेत. अजित पवारांनी ज्या भूमीत विकासरूपी स्वप्नांची बाग फुलवली, त्या भूमीत आज त्याच्या अस्तित्वाची राख सावडणे. ही वेळ येईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. काय झाले, कसे झाले आणि का झाले या प्रश्नांची उत्तरे अजूनही कुणाकडेच नाहीत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा कारभार खांद्यावर घेऊन चालणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी धावणारा, प्रशासनावर घट्ट पकड असलेला आणि विकासाचा वेग कधीही कमी न होऊ देणारा नेता एका क्षणात निघून जाईल, हे कुणालाच पचनी पडले नाही. काही प्रश्न नियती उत्तराविना सोडते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. सत्ता असो वा नसो, अजित पवारांचा दरारा कायम होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!