आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा राजकीय निर्णय

मुंबई / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नाही. या कठीण काळात आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री स्वतः कोणताही प्रचार करणार नाहीत. अजितदादांच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या सर्व २२ प्रचारसभा रद्द केल्या आहेत.राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ७ दिवसांत २२ सभांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैयक्तिक दुखवटा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुकांचा प्रचार स्थानिक नेते आणि पदाधिकारी सांभाळणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांमध्येही बदल केला आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. उमेदवारांना ५ फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ असेल. तर फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
२८ जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंच्या जनसमुदायात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

