दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचे वातावरण कायम,रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून

व्हिजन महासत्ता / मुंबई
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचे वातावरण कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपात असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केली असली तरी त्यापलीकडे कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. सध्या रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी ते हवाई क्षेत्रात वैमानिक किंवा इतर पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून अपघाताची शक्यता, तांत्रिक बाबी आणि नियमांचे पालन झाले होते का, याचा अभ्यास ते करत आहेत. अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येण्यास विलंब होत असल्याने त्यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकृत चौकशी अहवाल यायला अजून वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र हा अहवाल लवकर मिळावा आणि अपघातामागील सत्य स्पष्ट व्हावे, यासाठी रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

